Welcome to BookShop Online Shop!
Sale

मंतरलेले दिवस

100.00450.00

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

*मंतरलेले दिवस*
आम्ही परभणीच्या न्यू व्हेटरनरी हॉस्टेलला असताना दररोज सायंकाळी परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात चहा प्यायला जाणे हा आमचा एक अलिखित स्वरुपातला नियमच होता. आमच्या न्यू व्हेटरनरी हॉस्टेलपासून जवळपास चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवाजी चौकात जाऊन तिथून अर्धा कप बॉबी पिऊन परत आमच्या हॉस्टेलला येईपर्यंत आमचा दिवसभराचा दहा किलोमीटर अंतर चालण्याचा कोटा पूर्ण होत असे आणि आम्ही आमच्या न्यू व्हेटरनरी हॉस्टेलला परत येईपर्यंत आम्हाला कडकडून भूक लागायची, आणि आम्ही हॉस्टेलला परत आल्यावर जेवणाच्या डब्यावर अक्षरशः तुटून पडत असू. त्या काळात एका बहुदा हबीब नावाच्या मुस्लिम गृहस्थाकडे आम्ही मित्रांनी आमचे डबे लावले होते. या हबीबचा घरगुती पद्धतीचा डबा त्या काळात आम्हाला अतिशय चवदार लागत असे, विशेषतः त्याने डब्यात आणलेली अंडाकरी तर आम्हाला फारच भावत असे.
एकदा आम्ही परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चहा पिऊन आमच्या हॉस्टेलकडे परत येत असताना आम्ही परभणीच्या सुशील एम्पोरियमच्या थोडेसे पुढे आल्यावर आम्ही तिथल्या चौकात पोचलो असता तिकडून, परभणीच्या नारायण चाळीतून आमचे परममित्र शिरीष भारती सोप चघळत येताना दिसले. आमचे शिरीष भारती हे माझे अकरावी-बारावीपासूनचे मित्र असल्याने परभणी शहरात किंवा आमच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात आमची कुठेही भेट झाली की शिरीषला पाहून मला मोठाच आनंद होत असे. अशा वेळी आमची अनपेक्षितपणे भेट झाली की शिरीष आमच्या जवळ येऊन माझा हात हातात घेत असे आणि मग आम्ही गप्पा मारत मारत पुढची वाटचाल करीत असू.
त्यादिवशीही असेच झाले. परभणीच्या नारायण चाळीतून आलेल्या शिरीषने माझा हात धरला आणि त्याने आम्हां मित्रांना त्याने नव्यानेच लावलेल्या मेससंबंधी माहिती देण्यास सुरुवात केली. मारवाडी समाजाच्या कुण्या एका तरूण स्त्रिचा ‘एसबीआय’ मध्ये काम करणारा पती हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू पावल्याने त्या मारवाड्याच्या स्त्रिने तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी म्हणून परभणीच्या नारायण चाळीत एक घरगुती मेस चालू केली होती आणि आमचे शिरुभाऊ त्या मेसचे सदस्य झाले होते. त्या मारवाड्याच्या स्त्रिला तिच्या पतीच्या निधनाने जितका धक्का बसला नसेल त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्या घटनेचा धक्का आमच्या शिरीषला बसला होता आणि त्याचे मन त्या मारवाडी स्त्री विषयीच्या कणवेने भरून गेले होते. त्या दिवशी परभणीचे रेल्वे स्टेशन येईपर्यंत आमच्या शिरुभाऊने त्या विधवा आंटीची करुण कहाणी आम्हाला ऐकवली आणि आमचीही मने त्या आंटी विषयीच्या कणवेने भरून आली. पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळी आम्ही वर्गमित्र आमच्या न्यू व्हेटरनरी हॉस्टेलला परत जाताना पुन्हा त्याच चौकात आम्हाला आमचा शिरुभाऊ भेटला आणि त्याने आम्हाला त्या आंटी विषयीची अधिकची माहिती पुरवली. आता हे प्रकरण दररोजचेच झाले आणि बघता बघता आमच्या शिरुभाऊने आम्हाला हैराण करून सोडले. आम्ही आमच्या हॉस्टेलला परतत असताना आमचा शिरीष आम्हाला दररोजच भेटू लागला आणि आम्हाला त्या आंटीच्या करुण कहाण्या ऐकवू लागला. पुढे पुढे आमच्या शिरुभाऊचा हा जाच इतका वाढला की पेशवे काळात मोगल सैनिकांनी संताजी आणि धनजीची जशी धास्ती घेतली होती तशी शिरुभाऊची धास्ती माझ्या वर्गमित्रांनी घेतली आणि ते मला माझ्याशी मैत्री तोडण्याची भाषा बोलू लागले. मग एखाद्या घोटाळ्याचे प्रकरण आपल्या हाताबाहेर जात आहे असे राज्य शासनाच्या निदर्शनास आल्यावर राज्य शासन ते प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपवते,तसे आम्ही आमच्या शिरुभाऊचे हे ‘आंटी प्रकरण’ आमच्या पराग साहेबांकडे सोपवले आणि आम्ही निर्धास्त झालो. पुढे लवकरच आमच्या पराग साहेबांना तशी संधीही मिळाली.
त्या दिवशी आम्ही परभणीच्या सुशील एम्पोरियम पुढील चौकात येताच तिकडून आमचे शिरुभाऊ सोप चघळत आलेच आणि येताच त्यांनी माझा हात पकडला आणि त्यांनी आंटीचा उच्चार करण्यासाठी तोंड उघडले तेंव्हा आमच्या पराग साहेबांनी आमच्या शिरुभाऊचे ‘आ’ वासलेले तोंड बंद होण्यापूर्वीच ‘तू काय लावलं आहेस रे हे आंटी आंटी दररोजच आमच्या मागं’ असे शिरीषला म्हणत जी आमच्या शिरुभाऊंना झापायला सुरुवात केली, ते आमच्या पराग साहेबांचे आमच्या शिरुभाऊंना झापणे पाहून मला जे हसू आले, ते हसू आवरणे मला पुढे पुढे अशक्य झाले आणि शेवटी परभणीच्या सत्कार लॉजसमोरील किसान हॉटेलच्या अलिकडे मी अक्षरशः रस्त्यावरच बसलो, इतके मला आता हसू आवरणे अशक्य झाले. ज्या प्रमाणात त्या कुण्या अऩोळखी आंटीचा क्षोभ आमच्या मनात दाटला होता, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात आता तो क्षोभ हास्यरुपाने आमच्या मनाबाहेर पडत होता आणि माझ्या या हास्याचा महापूर असह्य झाल्याने माझ्यावर अक्षरशः रस्त्यात बसण्याची पाळी आली होती. एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते १९९४ या काळातल्या माझ्या परभणीतील दहा वर्षांच्या वास्तव्यात मी असे कितीतरी गमतीदार प्रसंग अनुभवले आहेत. आम्हाला परभणीत स्वातंत्र्यच इतके मिळाले होते की त्या काळात आम्हाला आमच्या वागण्यात कुठलेच धरबंध उरले नव्हते. कधी कधी आमच्या न्यू व्हेटरनरी हॉस्टेलवरील आमच्या गप्पा इतक्या रंगत की रात्र सरून पहाट कधी झाली हेही आम्हाला कळत नसे. त्या काळात आमच्या चहा पिण्याला तर कसलाच सुमार राहिला नव्हता.
परभणीचा उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू अतिशय कडक असतात. एकदा डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत आम्हाला चहा प्यायची लहर आली आणि आम्ही रात्री अकराच्या सुमारास परभणीच्या रेल्वे स्टेशनवर चहा प्यायला निघालो. परभणीच्या आमच्या न्यू व्हेटरनरी हॉस्टेलवरून परभणीच्या रेल्वे स्टेशनकडे निघाले की रस्त्यात परभणीची हमाल वाडी लागते. या हमालवाडीतून बाहेर पडले की लगेच पुढे नांदेडकडे जाणारा रेल्वे ट्रॅक त्या काळात लागत असे. हा रेल्वेचा रूळ ओलांडून पुढे गेल्यावर आमचा प्रवेश थेट परभणी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर होई.
त्यादिवशी आम्ही या प्लॅटफॉर्म नंबर एकवर पोचल्यावर ‘आता रेल्वे स्टेशनबाहेरील चहाच्या टपऱ्या बंद झाल्या असतील,’ असा विचार करून त्या प्लॅटफॉर्म नंबर एकवरीलच ‘चाय की दुकान’वर चहा प्यायचे ठरवून तसेच पुढे निघालो तर आम्हाला प्लॅटफॉर्म नंबर एकच्या शेडच्या अलिकडील अंधारातून “शूक शूक” असा आवाज आला. मी त्या आवाजाच्या दिशेने अंधारात निरखून पाहिले तर त्या अंधारातील एका सिमेंटच्या बाकड्यावर एक इसम बसल्याचे मला दिसून आले. ‘जाऊ दे, असेल एखादा भिकारी थंडीत कुडकुडत बसलेला,’ असा विचार करून मी पुढचे पाऊल टाकत असतानाच आम्हाला पुन्हा एकदा तोच “शूक शूक” असा आवाज आला.’ हा भिकारी थोडा आगाऊच दिसतोय,’ असे वाटून मी तसाच माझ्या मित्रांसोबत पुढे निघालो तितक्यात ‘ए पद्या…!’ असा भसाडा आवाज माझ्या कानी पडला तेंव्हा क्षणभरातच माझ्या लक्षात आले की ‘हा तर आपल्या शिरुभाऊचा आवाज आहे आणि आमचे परममित्र शिरीष भारती यांच्याशिवाय मला ‘पद्या’ म्हणून हाक मारणारे कोणीच नाही’ मग आम्ही सारे वर्गमित्र लगबगीने अंधारातल्या त्या सिमेंटच्या बेंचजवळ गेलो तर आमचे शिरुभाऊ चक्क व्हीआयपी अंडरवेअरवर उघडेच त्या बेंचवर बसलेले आम्हाला दिसून आले तेंव्हा आमची हसून हसून पुरेवाट झाली. मी आमच्या शिरुभाऊंकडे अधिकची चौकशी केली तेंव्हा आमचे शिरुभाऊ फक्त शंभर रुपयांच्या शर्यतीवर त्यादिवशी त्या व्हीआयपी अंडरवेअरवर उघडेच रेल्वे स्टेशनवर आले होते, असे त्यांनी आम्हाला सांगितले आणि त्यांच्या तशाच अवतारात आम्ही त्यांना ‘चाय की दुकान’वर चहा प्यायला नेले. माझ्या परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठातील दहा वर्षांच्या वास्तव्यात त्या काळात आमच्या वाट्याला आलेला प्रत्येक दिवस आम्ही असाच हसत खेळत घालवलेला असल्याने ‘माझ्या स्वेच्छानिवृत्तीच्या काळात मी फेसबुकवर लिहिलेल्या माझ्या लेखांचे संकलन करून एक पुस्तक प्रकाशित करावे,’असा विचार जेंव्हा पहिल्यांदा माझ्या मनात आला तेंव्हा मला आठवला तो माझ्या सातवी आठवीतल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘मंतरलेले दिवस’ नावाचा धडा आणि मी त्याच दिवशी ‘माझ्या लेखसंग्रहाचे नाव ‘मंतरलेले दिवस’ हेच ठेवायचे,’ असे निश्चित केले आणि दैवयोगाने माझे एकेकाळीचे सहकारी अधिकारी श्री. सतीश राऊत साहेबांनी मला सप्तर्षी प्रकाशनाचे श्री. सिद्धेश्वर घुले साहेबांचा फोनवरूनच परिचय करून दिला आणि मी माझ्या पुस्तक प्रकाशनाची पाच सप्टेंबर २०२१ ही तारीख नक्की केली कारण २०१५ सालीच्या याच तारखेला शिक्षकदिनी मी माझ्या उदगीरच्या विद्या वर्धिनी शाळेतील माझ्या प्रिय शिक्षकांचा सत्कार सोहळा उदगीरच्या जळकोट रोडवरील ‘जय हिंद पब्लिक स्कूल’ शाळेच्या सभागृहात आयोजित केला होता.
माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची तयारी चालू असतानाच परवा माझ्या मुलाने, अनूपने माझ्या असे निदर्शनास आणून दिले की मंतरलेले दिवस नावाची दोन पुस्तके यापुर्वीच प्रकाशित झालेली आहेत आणि या पुस्तकाचे लेखक आहेत ते आदरणीय ग.दि. माडगूळकर हे गुरुवर्य आणि बहुदा दैनिक लोकसत्ता’चे एकेकाळचे संपादक श्री. मधुकरजी भावे साहेब. मी ही बाब जेंव्हा श्री. सिद्धेश्वर घुले साहेबांच्या निदर्शनास आणून दिली तेंव्हा त्यांनी मला पर्यायी नाव सांगण्याविषयी मेसेज पाठवला. याच्या उत्तरी मी त्यांना ‘परभणीचे दिवस’ आणि ‘स्मृती गंध’ ही दोन पर्यायी नावे पाठवली असता आज सकाळीच मला त्यांचा व्हॉट्सॲप मेसेज आला आणि त्यांनी ‘स्मृती गंध मधल्या स्मृतीचा ती ऱ्हस्व असतो की दिर्घ,’ असे विचारले तेंव्हा मी त्यांना दिर्घ असे सांगत आपल्याला पुस्तकाचे नाव मंतरलेले दिवस असेच ठेवता येईल का,’ असेही विचारले तेंव्हा त्यांनी माझी तीव्र इच्छा विचारात घेऊन ‘आपल्या पुस्तकाचे नाव मंतरलेले दिवस असेच ठेऊ या,’ असे जेंव्हा सांगितले तेंव्हा माझ्या चेहऱ्यावर अतिशय समाधान पसरले कारण मी माझ्या पुस्तकाचे नाव अतिशय विचारपूर्वकच मंतरलेले दिवस असे ठरवले होते कारण मी परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात काढलेली ती दहा वर्षे म्हणजे माझ्या आयुष्याचा सुवर्णकाळच होता. आता माझ्या आयुष्यात तसे दिवस पुन्हा फिरून कधीही येणार नाहीत, असा मी जेंव्हा विचार करतो तेंव्हा मला गदगदून येते.🙏

Additional information

Book Author

डॉ. प्रदिप विश्वंभरराव भरवाळे

ISBN NO

978-81-950199-4-6

Language

Marathi

Publication

saptarshee prakashan

Book Type :

Paperback, Ebook

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart