Welcome to BookShop Online Shop!

मंगळवेढे भूमी संतांची

मंगळवेढे भूमी संतांची

मंगळवेढे भूमी संतांची…..

मंगळवेढे भूमी संतांची या गीतातून मंगळवेढ्यातील संत महिमा महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम लोक गायक प्रल्हाद शिंदे यांनी केले. मंगळवेढा हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नजिकचे तालुक्याचे ठिकाण ! मंगळवेढा हे नाव चालुक्य सम्राट मंगलेशाच्या नावावरुनच पडल असावं असा संदर्भ मांडला जातो. मंगलेशाचा इथं तळ होत भिवघाटच्या एका कन्नड शिलालेखात तिथे मंगळवाड असा उल्लेख सापडतो.मंगलेशबीडू म्हणजे मंगलेशाचा तळ तेच आजचे मंगळवेढे कन्नड मध्ये बीडू या शब्दाचा अर तळ मुक्काम असा होतो.
राजांच्या आश्रयामुळे कला आणि शिल्प यांचा येथे विकास झाला . शिल्पशास्त्र , मंदिरांची उभारणी , पाण्याच्या बारवा , रम्य प्रासाद ,किल्ला आणि त्यासभोवतालचा खंदक ,किल्ल्याचा तट या सगळ्या गोष्टींनी नटलेले हे वैभवशाली ठिकाण !
काळाच्या ओघात यातील बहुतांश खुणा नष्ट झाल्या असल्या तरीही काही मोजक्या खाणाखुणा आज दिसून येतात . यावरून या बिज्जल राजांच्या राजधानीच्या ठिकाणाचे तत्कालीन प्राचीन भव्य रूप नजरेत भरल्याशिवाय राहत नाही . विविध ठिकाणी विखरून पडलेले दगडी शिल्पखांब ,प्राचीन भव्य मूर्ती , मंदिरांचे खांब शिलालेख , वीरगळ अशांनी खचाखच समृद्ध असलेली ही भूमी!
संत दामाजी पंतांच्या कालखंडात दुर्गादेवीचा भीषण दुष्काळ या पंचक्रोशीत पडला आणि अवघ्या मुलुखाची वाताहत केली .उपाशी जनतेसाठी सरकारी ज्वारीची आणि धान्याची कोठारे संत दामाजीपंतांनी रीती करून जनतेला जगवले.त्याची रशीद बिदरच्या बादशहाकडे विठू महाराने पोहोच केली . या घटनेने मंगळवेढा नगरी आणि श्री संत दामाजी पंत साऱ्या मराठी मुलुखात प्रसिद्ध पावले . ” पहा मंगळवेढा हा दामाजीचा ” किंवा ” झाला महार पंढरीनाथ ” अशी कवने लिहिले गेली आणि मंगळवेढ्याचे गायक प्रल्हाद शिंदे यांच्या मधुर आवाजात आजही गीते प्रभात समयी कानी पडतात.
संत चोखामेळा , त्याची पत्नी सोयरा ,पुत्र कर्ममेळा , मेहुणा बंका , संत कान्होपात्रा,सीताराम महाराज अशा संतांची मांदियाळी येथेच भक्तीचा मळा फुलवत निजधामास प्राप्त झाली . महात्मा बसवेश्वर यांचे वास्तव्य येथेच होते . मधवाचार्य द्वाइत सांप्रदायाचे अर्धर्वयु श्री जयतीर्थ टिकाचार्य त्यांची गादी चालवणारे थोर व्यक्तिमत्व ! जयतीर्थांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली आणि मोठा लौकिक मिळवला .
महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! सन १६६५ मध्ये त्यांच्या पावन स्पर्शाने ही भूमी पावन झाली . त्यांचा मुक्काम मंगळवेढ्याच्या किल्ल्यामध्ये होता . भोसले राजघराण्यातील मुधोजी राजे , शहाजी राजे , छत्रपती संभाजी राजे ,छत्रपती व्यंकोजी राजे , महाराणी येसूबाई , सातारचे छत्रपती रामराजे , शेवटचे छत्रपती आप्पासाहेब उर्फ शहाजी महाराज यांचे सानिध्याने लागले .छत्रपतींच्या घराण्यातील अनेकांनी भेट दिलेली संत भूमी म्हणजे मंगळवेढा नगरी !
औरंगजेबबादशहा दख्खनच्या मोहिमेवर असताना सुमारे साडेचार वर्षे मंगळवेढ्याजवळील ब्रह्मपुरी ( माचनूर- बेगमपूर ) येथेच तळ ठोकून होता . जणू काय ती त्याची तात्पुरती राजधानीच होती . दर शुक्रवारी मंगळवेढ्यास जुम्मा मशिदीमध्ये तो नमाज पडण्यासाठी येत असे .
पेशवाई काळात पटवर्धन घराण्यास मंगळवेढा येथील मामलत मिळाली . या घराण्यात अनेक पराक्रमी आणि मुत्सद्दी पुरुष निर्माण झाले . त्यांनी मराठी दौलतीची सेवा केली .
मंगळवेढा हे आदिलशाही राजवटीचे जणू प्रवेशद्वार होते .आदिलशहावर कोणालाही आक्रमण करावयाचे झाले तर त्याला मंगळवेढ्याच्या किल्ला प्रथमतः ताब्यात घ्यावा लागत असे . त्यामुळे या भुईकोट किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते . मराठी सत्तेसोबत आदिलशाही गिळंकृत करण्याचा भरपूर प्रयत्न औरंगजेबाने केला .
छत्रपती संभाजी राजांनी मंगळवेढा किल्ला ताब्यात घेऊन बादशहाची दक्षिण मोहीम धोक्यात आणली . मराठ्यांच्या इतिहासाचा मानबिंदू ठरावा असा राजकीय पेच त्यांनी बदशहापुढे उभा केला , तोही इथूनच !
प्राचीन इतिहास पाहताना मंगळवेढा नगरी म्हणजे चालुक्य राजघराण्याची एक राजधानी होती . त्याकाळी ही नगरी वैभवशाली होती ,गजबजलेली होती .
मंगळवेढ्यातील अति प्राचीन हेमाडपंथी काशीविश्वेश्वराच्या देवळाची निर्मिती शके १४९४ च्या पूर्वी काही दशके झाली असावी , असे अनुमान इतिहासाचार्य राजवाडे यांनी काढले आहे . या अत्यंत देखण्या आणि कलाकुसरीने नटलेल्या , शिलालेखांनी भरलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार मंगळवेढ्याच्या मुजुमदाराने केला . हा मुजुमदार दामाजीपंतांची चहाडी ज्या मुजुमदाराने पातशहाकडे केली त्याचाच वंशज होता असे म्हणतात .श्री संत दामाजी पंतांचे वंशज सध्या गुलबर्ग्यामध्ये आहेत , असे समजते .
इतिहासकार राजवाडे यांनी दामाजीपंतांबद्दल सांगितलेली कथा अशी — खूप भीषण दुष्काळ पडला , ओळीने चारपाच वर्षे काहीच पाऊस पडला नाही .लोक अन्नाविना मरू लागले . संत प्रवृत्तीच्या दामाजीपंतांना ते सहन झाले नाही . ते बादशहाचे कुलकर्णी म्हणून काम करत . त्यांनी सरकारी धान्यकोठारातील ज्वारी सगळ्या लोकांना वाटून टाकली . धान्य देऊन टाकल्यानंतर राशिदेचे पैसे बादशहास देणे दामाजीपंतांना श्यक्य न्हवते . राशिदीकरता बादशहाचे धरणे दमाजीपंतांवर येऊन बसले .द्रव्य कोठून आणावे अशा विवंचनेत दामाजीपंत पडले .अन्यथा काळकोठडी अटळ होती .या संकटाचा साक्षीदार विठू महार होता . त्याच्याकडे वडिलोपार्जित पुरलेले धन होते . राशिदीची रक्कम पूर्णपणे फेडण्यास ते पुरेसे होते . हे द्रव्य बिदराला सरकारात भरण्याची प्रेरणा त्याला झाली कारण तो विठ्ठलभक्त वारकरी होता . विठू महाराने ही रक्कम बिदरला जाऊन सरकारजमा केली , रशीद दामाजीपंतांना दिली आणि दामाजीपंतांची सुखरूप सुटका झाली.अशी आख्यायिका आहे.

मंगळवेढेकरांना अभिमान आहे तो मंगळवेढ्याचा काळया कसदार मातीतील संतांचा , नररत्नांचा ! अशा अनेक प्रकारे लौकिक पावलेली मंगळवेढा नगरी आता मात्र काहीशा उपेक्षित अवस्थेत काळ कुंठत आहे .पूर्वीच्या वैभवखुणा लुप्त झाल्या आहेत . अशा भूमीच्या सर्वंकष विकासासाठी व व पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक पटलावर प्रयत्नांची गरज आहे. आजवर या सीमा भागातील संतभूमीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. शासकीय पातळीवरून गरज आणि अपेक्षा आहे संतांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या मंगळवेढे नगरीच्या विकासाची आणि येणाऱ्या भविष्यकाळात ती पूर्ण होईल अशी आशा करूया…!

Leave a Reply

Close Menu
×
×

Cart